शुक्रवार, २७ मार्च, २०२०

बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*



*बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*

हात जोडून करते,
विनंती मी सर्वांना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

बाहेर थैमान घालतो,
भयानक हा करोना..
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

आम्हा चिमुकल्यांसाठी,
तुम्ही हे करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

झटत आहे सर्व,
सहयोग त्यांना करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

दिवस हे ही असेच,
भुर्रकन निघून जाईल ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना.....

बुधवार, २५ मार्च, २०२०

* मरण पाहिले मी डोळा...* मित्रांनो किमान १५ दिवस आधी माझ्याकडे एक उच्चभ्रू ग्राहक वीज बिलाची तक्रार घेऊन आले. सहज कोरोनाचा विषय निघाला तर त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ इटलीमध्ये आहे आणि साक्षात मृत्यु तिथे दरवाजात उभा आहे अशी परिस्थिती तिथे आहे. सर्वांनी घरात स्वतःला २० पेक्षा अधिक दिवसांपासून कैद करून ठेवलेले आहे आणि तेही अनिच्छित कालावधीपर्यंत.. टीव्हीवर बातम्यांमध्ये १००% दाखवत नाही माझा भाऊ आहे म्हणून परिस्थती मला माहिती आहे.. घराबाहेर निघाले का पोलीस उचलून नेतात अशी परिस्थिती तिथे झालेली आहे. आपल्याकडे याहीपेक्षा भयानक परिस्थिती उदभवणार आहे, आपल्या देशातील लोकसंख्या, त्यांच बेशिस्त वागणं हे आपल्याला इतर देशांचा अनुभव असून गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.. मी सुद्धा नेहमी प्रमाणे त्या गोष्टीला तेव्हा लाईटली घेतले, जसे आज आपण घेत आहोत.. पण त्यांनी सांगितलेल्या आज प्रत्येक गोष्टी खऱ्या होत आहे. तो मृत्यूचा थैमान मला डोळ्यांनी दिसत आहे. मित्रांनो हे लाईटली घेणंच आपल्याला महागात पडेल.. आपण करोनावर जोक्स काय केले त्यावरून आपलं या महामारीविषयीच गांभीर्य दिसून येते. जुन्या काळी महामारी यायची तेव्हा लोकांपर्यंत सर्व सोयी नव्हत्या, बिमारीच निदान देखील लागायचं नाही..गावच्या गावं खाली व्हायची.. आज आपल्याकडे सर्वच आहे. एका क्षणात आपल्याकडे सर्व माहिती पोहचते.. पण सर्व असून सुद्धा आपलं लाईटली घेणं, वागणं आपल्याला पर्यायाने सर्व देशाला मृत्यूत ढकलणार आहे. सरकार घरात थांबायला सांगत आहेत, प्रधानमंत्री हात जोडून विनंती करीत आहे कृपया त्यांच्या सुचनांची पायमल्ली करू नका.. पुढील २१ दिवस करोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे अतिआवश्यक आहे.. अस म्हणत पडल्याशिवाय शहाणपण येत नाही.. पण सध्या घराबाहेर पडू नका.. इतर देशांपासून अनुभव घेणे आवश्यक आहे.. आज आपण हे २१ दिवस पाळले नाहीत तर अजून कितीतरी अनिश्चित महिने घरात बंदिस्त व्हावे लागेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल.. करोना ही अशी बिमारी आहे की यामध्ये मृत्यू जर झाला तर मयतीला देखील कुणी हजर राहणार नाही.. मला काही होत नाही, भगवंत पाठीशी आहे म्हणून शहाणपण मारू नका. वेळीच सावध व्हा अजूनही वेळ गेलेली नाही..एकाची छोटीशी चूक सर्वांना भारी पडू

बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*



*बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*

हात जोडून करते,
विनंती मी सर्वांना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
बाहेर थैमान घालतो,
भयानक हा करोना..


मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
आम्हा चिमुकल्यांसाठी,
तुम्ही हे करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
झटत आहे सर्व,
सहयोग त्यांना करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
दिवस हे ही असेच,
भुर्रकन निघून जाईल ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना..


गुरुवार, १९ मार्च, २०२०

दोन_गोष्टी


#दोन_गोष्टी

#दोन_गोष्टी

_चित्रपटाचे कथानक उत्तम होते, त्यात अभिनय करणारे अभिनेता व अभिनेत्री दोघेही नवीन असल्याने अभिनयात पाहिजे तेवढा कस नव्हता तरी  कथानकाच्या भरवश्यावर चित्रपट यशस्वी झाला._

#दूसरी...

_चित्रपटाचे कथानक काही खास नव्हते, परंतु अभिनेता आणि अभिनेत्री यांनी त्यांच्या भारदस्त अभिनयाच्या जोरावर चित्रपट यशस्वी झाला._


तात्पर्य

_यातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आपण जेथे जन्माला येतो, ते कथानक ( परिस्थिति) सुंदर असेल तरी आयुष्य सुंदर जगता येते._ _कथानक (परिस्थिति) प्रतिकूल असले तरी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आयुष्य उत्तम जगता येते._
_कथानकाची निवड (जन्म) जरी आपल्या हातात नसली; आयुष्याच कथानक ( परिस्थिति ) सुंदर नसले तरी आपण आपल्या भारदस्त अभिनयाच्या म्हणजेच कर्तुत्वाच्या जोरावर आयुष्याचा चित्रपट यशस्वी करु शकतो. त्यामुळे विपरीत असली तरी आपण जगण्याचा, विजयाचा संघर्ष सोडू नये......

रविवार, १५ मार्च, २०२०

पाणी


चिमुकल्या ह्या रोपांना,
चला पाणी देऊ,
उद्याच्या भारताची,
निव आपण ठेवू..

फुलं फळ देतील,

उद्या हीच रोपे,
आज पाणी देण्याचे,
काम करू सोपे..

शान आहे घरांची,
ही फुलं झाडे,
झोपड्याही दिसतात खुलून,
जणू राजवाडे..

चला निसर्गाची,
राखू निगा सारे,
भरून टाकू श्वासाची,
घरोघरी कोठारे...

सोमवार, ९ मार्च, २०२०

विसावा



थांबुनी थोडा,
तू घे उसासा,
मिठीत माझ्या,
तू घे विसावा...


मिठीत तुझ्या,
देह स्थिजावा,
श्वासात तुझ्या,
श्वास भिनावा..

प्रेमाचा रंग,
असा खुलावा,
इंद्रधनूलाही,
तो लाजवावा..

काळोखातही जो,
चेहरा दिसावा,
तो पौर्णिमेचा,
तू चंद्र व्हावा..

पाहण्यास त्यासी,
जो नित्य झुरावा,
तो झुरणारा,
मी चकोर वहावा..

महिला दिवस



_*हिला* समजून घेतलं की खरा *म"हिला"* दिवस.._

बायका म्हणजे पुरुषांच्या हातातील दुर्दैवी खेळणं ( पण पुरुषच स्वतः खेळणं असल्याच्या आव दाखवतात), सोशल मीडियातून तिच्यावर जोक्स करणं, कंमेंट्स करणं आजकाल सर्व नॉर्मल...
कारण त्या अगदीच बालबुद्धी असतात असा आमचा काहीसा समज..
अरेच्चा चुकलो...
समज नव्हे तर दृढ विश्वासचं..
एकही दिवस असा नसेल की, सोशीलमीडियावर बायकोविषयी जोक्स आम्ही फॉरवर्ड करत नसणार... "हे बायकोवरचे जोक्स म्हणजे आपली बायको सोडून केलेले जोक्स असतात, असं पाठवणारे गृहीत धरतात..
 हे तर असंच झालं की, एखाद्या भारतीयाने म्हणावं, भारतीय मूर्ख आहेत, आणि त्यात आपण नाही अशी समजूत करून घेणे..
त्यामुळे बायकोवर जोक्स करतांना, ते फॉरवर्ड करतांना अनामिक आनंद लग्न झालेल्यांना  आणि न झालेल्यांना सुद्धा असतो.
लग्न न झालेले तर आपण आता आयुष्यात कधी लग्न करणारच नाही अशा अविर्भावात बायकोवरचे मॅसेज पाठवून टिंगल उडवत असतात.
बायको नावाची संज्ञाच आपण चिल्लर करून टाकली आहे. पण ती आई या संज्ञेएवढीच पवित्र आहे हे आपण सर्रास विसरून जात आहोत.
खरं तर बायकाही जास्त दिमाग लावतच नाहीत. कारण त्यांना आपला नवरा हुशार आहे यात समाधान असतं.. घरातील जबाबदारीच ओझं त्यांना दिमाग लावूच देत नाही. 

बर हे आजपासूनच चालू आहे असे नाही.. तर अनंतकाळापासून स्त्रिया-बायकांना दुय्यम स्थान दिले गेले.. 
मनोरंजन आणि भोगवस्तू म्हणून त्यांचेकडे पाहिले गेले..
मुघलांच्या काळात तर भर रस्त्यावरून तिला घरच्यांच्या डोळ्यादेखत उचलून नेले जात होते.. पती मेला की तिने जीवंत सती जावे..
आणि पत्नी गेली तर नवऱ्याने दुसरी बायको करावी..
एका नवऱ्याला एकापेक्षा जास्त पत्नी करायला हरकत नव्हती पण तिने मात्र एकाच नवऱ्यासोबत जगावं आणि मरावं..
मागे झोम्बी कादंबरी वाचली. त्यातील नायिकेला तीने केवळ मुलीला जन्म दिला म्हणून किती यातना सहन कराव्या लागल्या.
वाचणाऱ्याच्या डोळ्यातून त्या पाठीवर बसणाऱ्या चाबकागणिक अश्रू वाहत असतील तर तिने किती खस्ता खालल्या असतील याची अपेक्षाच न केलेली बरी..
केवळ मुलगी आहे म्हणून तिला दूध भात देखील खायला मिळत नव्हता कारण ते सर्व मुलांसाठीच..
आधीपासून चूल आणि मूल ही दरवार्षिक योजना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये समाजाने इन्स्टॉल केली त्यामुळे त्या एका सीमित कक्षेपलीकडे विचारचं करत नव्हत्या आणि करायला गेल्या तरी पुरुष प्रधान संस्कृती आहेच रोखायला.
ते तेवढं तरी बरं झालं, देशाच्या घटनेने स्त्री पुरुष समानता अधिकार बहाल केला, म्हणून एक महिला देशाची राष्ट्रपतीच नव्हे तर चंद्रावर देखील पाऊल ठेवून आली.
तिला जर संधी दिली तर तिने सिद्ध करून दाखविले आहे की ती पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच सरस आहे..
पण आम्ही पुरुष.. 
मुलींनी घरी किती वाजता यावं, त्यांनी काय घालावं, काय बोलावं, कसं वागावं यावर निर्बंध घालून त्यांना त्यांना आवर घालू..
आजही ज्या घरात बहीण भाऊ आहे तिथे जेवण झाल्यावर भावाचे ताट बहिणीनेच उचलावे व धुवावे अशी प्रथा आहे..
निसर्गाचा नियम आहे की एखाद्या रोपट्याला हवा, पाणी आणि ऊन योग्य प्रमाणात मिळाले नाही तर त्या रोपट्याची हवी त्या प्रमाणात वाढ होत नाही.

पती जेंव्हा हिम्मत हारतो तेंव्हा हिम्मत देणारी पत्नीच असते. स्वतःची जन्मजात ओळख पतीबरोबर त्याची जीवनसंगिणी होऊन मिटवून टाकते. आजारपणात पुरुष महिलांची जी सेवा करत नसेल ती सेवा आईनंतर केवळ एक पत्नीचं करू शकते. मुलांना संस्कार देण्याचे काम सुद्धा तीच करते.
आणि आम्ही म्हणतो,
ती कुठे काय करते?

खरं तर आज,
महिला दिवस,
*वूमन डे*
ज्यांचं *मन* हे कधीच स्वतःचा विचार करत नाही अशा त्या *वुमन*
त्यांचं *मन* जिंकता आलं तर खरा *वुमन डे*

आई असते तेव्हा लेकरांचा, बहीण असते तेंव्हा भावाचा,
पत्नी असते तेंव्हा पतीचा विचार करते..
ती आयुष्यभर नेहमी दुसऱ्याचाचं विचार करते. म्हणून ती श्रेष्ठ ठरते पुरुषांपेक्षाही...

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तर ग्रामगीतेमध्ये महिलांविषयी एक स्वतंत्र अध्यायच लिहला,
 ते म्हणतात,


विद्यागुरुहुनि थोर । आदर्श मातेचे उपकार।।
गर्भापासुनी तिचे संस्कार । बालकावरि ।।

'जिच्या हाती पाळण्याची दोरी ।
तीच  जगाते  उद्धरी '।
ऐसी  वर्णिली  मातेची  थोरी ।
शेकडो  गुरुहूनिहि ।।

मातेच्या  स्वभावे  पुत्राची  घडण ।
त्यास  उज्वल  ठेवी  तिचे  वर्तन ।
स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचे मोठेपण ।
ऐसे  आहे ।।

म्हणती  जरि  बाप  तैसा  लेक ।
परि  माउलीचे  महत्व  अधिक ।
मातृशक्तीनेच वाढती सकळिक  ।
मुले  चारित्र्याने ।।
        
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरगिणी नाही ।
स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ।।

मुलीने सदा लपोनि राहावे । मुलाने गावी रागरंग पाहावे ।
ऐसे हे दृष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हा ।।

जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना ।
आपुल्या सुखदुखाच्या भावना । प्रकटवाव्या सभा-संमेलनी ।।

स्त्री-पुरुष ही दोन चाके । जरी परस्पर सहायके ।
तरीच संसार - रथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ।।

आज मी तुमच्यासोबत केवळ एका महिलेमुळे आहे. कधी ती आई, कधी बहीण, मैत्रीण तर कधी पत्नी म्हणून कुठल्या ना कुठल्या नात्यातून आपल्यासोबत असते.
म्हणून आई या प्रमाणे बहीण, मैत्रीण, पत्नी यांचा देखील सन्मान व्हावा हीच अपेक्षा.

समाजी जो पुरुषांशी आदर,
तैसाचि महिलांशी असावा व्यवहार।
किंबहुना अधिक त्यांचा विचार,
व्हावा समाजी ।।


गुरुवार, ५ मार्च, २०२०

रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे


*रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे*

_गरीबांच्या जीवावरच श्रीमंत झाल्याची बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत परंतु त्या गरिबांची स्थिति मात्र जैसे थे._
_कुलीची भूमिका साकारणारा अमिताभ बच्चन घ्या, मेरी जंग मधील अनिल कपूर घ्या किंवा अवतार मधील राजेश खन्ना असो._
_यांनी सुरुवातीला जी गरीब वर्गातील व्यक्तिरेखा साकारली त्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले व त्याच्या बळावरच ही मंडळी सुपरस्टार झाली._
_आजही कुपोषित मुलांच्या, भिक मागणाऱ्या मुलांच्या, डोक्यावरून कोसन् कोस पाणी वाहून आणणाऱ्या महिलांच्या फोटोला चित्रप्रदर्शनीत प्रथम पारितोषिक मिळते, भली मोठी रक्कम मिळते._
_याच कारण आपल्यातील भावना अजुन मेलेल्या नाही. ते दुःख आपल्या डोळ्यासमोर येते व आपण पटकन कुठलाही विचार न करता त्या कलाकाराला, फ़ोटोग्राफीला दाद देतो. पण त्या कुलीचे, कुपोषित-भिक मागणाऱ्या मुलाचे, किंवा त्या कोसन् कोस डोक्यावरून पाणी वाहून आणणाऱ्या महिलेच्या वास्तविक आयुष्यात कुठलाही फरक पड़त नाही उलट त्यांच्या आयुष्यावर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात प्रगतीचा एक तुरा रोवला जातो._
_याला कारणीभुत आपणच आहोत. चित्रपटगृहात गेलो की आपण भावनिक होतो व प्रत्यक्ष जीवनात मात्र आपण त्या भावना जोपासत नाही. म्हणून मेरी कोम ने आयुष्यात जेवढी कमाई केली नाही त्यापेक्षा किती तरी पट दिग्दर्शक आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा ने मेरी कोमच्या जीवनावर चित्रपट बनवून कमविले._
_वास्तविक आपण दाद त्या कलाकराला नाही तर त्या कुलीच्या, मेरिकोमच्या संघर्षाला देतो. त्या कुपोषित मुलाच्या, भिक मागणाऱ्या मुलाच्या फ़ोटोला बघताच आपण भावनिक होतो._
_असे बरेच कुली, महिला, मुले आजही आपल्या आजुबाजुला आहेत पण त्यांना कुठलीही मदत देण्यास आपण तयार नसतो._
_हे फक्त एक उदाहरण आहे अशा बऱ्याच बाबी आहेत. आपण केवळ रील लाइफ मधे भावनिक न होता रियल लाइफ मधे देखील आपली भावनिकता जोपासली पाहिजे._


शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

आई

***जाणीव झाली मला,*
*स्वतः बनल्यावर मी आई,*

९ महीने उदरात तुझ्या,
वाढले मी आई,
किती त्रास तुला,
झाला असेल आई,
खरंच किती ग्रेट,
आहेस तू आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई..

कळा किती तू ,
सोसल्या ग आई,
मला किती तू,
जपले ग आई,
जन्माआधिपासून प्रेम,
केलेस तू आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई..

मुलगा-मुलगीत तुला,
रस नव्हता आई,
सुदृढ़ बाळासाठी तुझा,
हट्ट होता आई,
जखमेच्या वेदना तुला,
झाल्या असतील आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई,

ईश्वराच अंश तू,
आहेस गं आई,
मायेचा सागर तू,
आहेस गं आई,
कुटुंबाचा आधार तू,
आहेस गं आई,
जाणीव झाली मला,

फरक


_नेमकं साध्य आणि साधन यातील फरक ओळखता न आल्याने आपली गफलत होत आहे._
_आपण आयुष्य जगण्यासाठी काम करत होतो हे विसरून काम करण्यासाठी आयुष्य जगत आहे अशी परिस्थिती होऊन जाते.._
_नुकतेच राज्य सरकारने पहिला व तिसरा शनिवार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी म्हणून जाहीर केलेला आहे पण यांमुळे जबाबदारी देखील अधिक वाढली आहे..._


वाढले कामाचे तास,
प्रवास नाही सोपा,

थोडा वेळ देऊन,
आपल्या तब्येतीला जपा..

सोमवार ते शुक्रवार,
उत्साहात काम करा,
शनिवार आणि रविवार,
मस्त आराम करा..

इमाने-इतबारे,
कामे वेळेत करा,
स्वतःची असतील काही,
ती सुटीत करा..

ग्राहकांच्या सेवेला,
प्रथम स्थानी ठेवा,
पण ऑफिस आणि घर,
दोन्ही स्वतंत्र ठेवा..

साध्य आणि साधन,
फरक यातील ओळखा,
तान-तणावचा,
उतरून टाका बुरखा....

माझी लहान मुलगीे...

माझी लहान मुलगी ऊर्जा हिला तिची आई इंग्रजीतून ओळख करून देते तर त्याच गोष्टीची ओळख मी मराठीतून करून देतो..
बोलणं शिकण्याच्या वयापासूनच मुलीला एकाच शब्दांसाठी दोन भिन्न शब्द शिकवले जात असल्याने नेमका तिचा संभ्रम वाढू शकतो..
या विषयावरची मी केलेली ही कविता...

ती शिकवते पिग,



मी शिकवतो डुक्कर,
इंग्रजी मराठीच्या नादात,
पोरीला येतोय चक्कर..

ती शिकवते फॅन,
मी सांगतो पंखा,
नेमकं काय म्हणावं ?
पोरीला येते शंका..

दीड वर्षाच्या पोरीला,
शब्दांची ओळख पटवतो,
ती सांगते इंग्रजीत,
तर मी मराठीत शिकवतो.

एकाच गोष्टीची तिला,
पर्यायी नावे सांगतो,
यामुळेच बहुदा तिचा,
बोलण्याचा प्रयत्न लांबतो..

इंग्रजी-मराठीच घरातं,
चालू असते फ्युजन,
दिवसेंदिवस वाढतंय,
पोरीचं कन्फ्युजन..

मला तरी वाटतंय,
आधी मराठीतच शिकवावं,
मातृभाषेचे बीज आपलं,
बालपणीचं रुजवावं...


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

आज तर तिने मला , वेड्यातच काढले!!



आज तर तिने मला ,
वेड्यातच काढले!!

ती म्हणाली माझ्यावर,
किती प्रेम करतोस?
मी म्हटले खूप खूप,
आभाळाएवढं करतो?

उत्साहित होत ती म्हणाली,
सांग माझ्यासाठी तू,
काय करू शकतोस?
मी म्हटलं,
राणी बनवून तुला,
सुखी ठेवू शकतो?

ती अधिक आनंदित होत म्हणाली,
खरंच असं होईल का?
अंग म्हटलं हो,
अगदी तुझ्या गळ्याची शप्पथ.

हात माझा हातात घेत,
ती भावविश्वात रमली,
किती मजा असेल न!,
हरपून भान बोलली..

आपला सुखी संसार,
तू राजा अन मी राणी,
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..

मधेच हातातील हात काढून,
तिला थांबवत म्हटलं,
काय म्हणालीस?
ती एकदम थबकली,
अन म्हणाली,
राजा, माझं काही चुकलं का?
मी म्हणालो,
तू आता काय बोललीस?
पुन्हा जरा सांगशील का?

थोडं दबकतच म्हणाली ती,
तू राजा अन मी राणी...
मी म्हणालो,
पुढे काय बोललीस?
पुढे?
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..

हा.
सखे इथेच तर तू चुकलीस..

जीवापाड माझं सखे,
तुझ्यावर प्रेम आहे,
तुझ्यासाठी काहीही करू शकेल,
एवढं धैर्य देखील आहे..

पण का म्हणून सोडू मी,
ज्यांनी जन्म दिला मला,
आणि थोडा पण विचार तु,
ना बोलण्याआधी केला...

जन्मलो नव्हतो जरी मी,
त्यांनी प्रेम मला केलंय,
चालणं, बोलणं शिकवून,
स्वतःच्या पायावर उभं केलंय..

सांग तुझ्यासाठी मी,
त्यांना कस सोडू ?
स्वप्न त्यांची मोडून,
तुझ्याशी संसार कसा थाटू?

ते होती म्हणूनच तर,
तुझी माझी भेट झाली,
त्यांच्याविना संसाराची,
डोक्यात कल्पनाच कशी आली?

माफ करा मला,
मी तुझ्यासाठी,
काहीही करू शकणार,
पण आईबाबांना सोडून,
तुझ्यासोबत नाही राहू शकणार..

भलेही मी आजन्म,
लग्न करणार नाही,
प्रेम आहे तुझ्यावरच,
दुसरीवर करणार नाही..

आजही माझं तुझ्यावर,
तेवढंच प्रेम आहे,
पण तुझ्यापेक्षा थोडं अधिक,
त्या दैवतावर आहे.

उदास न होता तिचा,
निरोप मी घेतला,
प्रेमाचा गुंता कसा,
एका क्षणात सुटला...

माझ्या तशा वागण्याने,
ती बुचकळ्यातच पडली,
तिच्या मनातली भावना,
मला आपसूकच कळली..

चेहऱ्याकडे बघत तिच्या,
मीच तिला बोललो,
अगं, वेडे
बर झालंस तू मला,
लग्नाआधीच सांगितलं,
घटस्फोट होण्यापासून,
आपलं आयुष्य तर बचावलं.


गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*



*आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*

आज एका मित्राची कविता वाचली. त्यात त्याने आपल्या प्रेयसीला भेटण्याबद्दलची, तिच्याविषयी असलेल्या प्रेमाबद्दलची तळमळ, कळकळ शब्दांतून प्रकट केली.
सहावर्षांचा प्रदीर्घ असा काळ. किमान एकदा तरी तिची भेट व्हावी, तिचं आरसपाणी सौंदर्य एकदा तरी डोळ्यांत साठवता यावं यासाठी तब्बल पंचवीस वेळा त्याने तिला आज मनाशी पक्क ठरवून फोन लावला. तिने त्यावर साधा रिप्लाय पण दिला नाही. शेवटी ब्रम्हास्त्र काढावं आणि प्रत्यंच्या खेचून मनात काहीतरी मंत्र पुटपटावे तसे त्याने शेवटचा कॉल केला आणि यावेळी नेमका तिने फोन उचलला.
मला तुला भेटायचे आहे. तिने नकार दिला.. माझ्याशी बोलू नकोस पण मला एकदा तुला फक्त बघायचे आहे. मी दुरूनच बघणार पण प्लिज एकदा तरी भेट.
शेवटी त्याची विनवणी-गयावया मान्य करीत ती तिच्या घराबाहेर मैत्रिणीसोबत नाश्ता करण्याच्या निमित्ताने आली.
एखाद्या अतृप्त आत्म्याप्रमाणे तो तिला डोळ्यात साठवत होता, गाडीवर बसून दुरूनच तिला बघत होता.
बऱ्याच वर्षांनंतरची तीची ही भेट होती.
जणू काही शेवटची भेट असल्याप्रमाणे तो तिला पाहत होता.
आज तो खुप खुश होता ती एक शब्द ही न बोलता तिथून निघून गेली. साधा एक कॉल पण तिने नंतर केला नाही..
पण हा आज रात्रभर झोपला नाही.. ते स्वप्न, तो चेहरा त्याला झोपू देत नव्हता. त्याच्या पोटात अन्नाचा एक कण पण नव्हता, त्याला अन्न सुद्धा गोड लागत नव्हते..
किती प्रेम नि किती प्रेम.. तो प्रेमवेडा झाला होता, त्याचे मन कशातही लागत नव्हते.. त्याला स्वस्थ बसू देत नव्हते..
बस्स हीच तळमळ, हीच कळकळ आपल्या ध्येयाविषयी असली की आपण धेय्यापासून दूर असूंच शकत नाही. ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा होता तसा तो धेय्यवेडा झाला की, यश त्याला मिठी मारायला तयार असते.
_पण शोकांतिका ही आहे की आपण ज्यावेळी ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ते न केल्याने आपल्या पदरी निराशा राहते किंवा जे मिळवण्याची आपली लायकी होती त्यापेक्षा कमीवर समाधानी राहावं लागतं._

सलग पंचवीस कॉल, तिला केलेल्या विनवण्या हीच तळमळ आपल्या धेय्याशी असली, आपल्या प्रयत्नांचा एवढा पाठपुरावा आपण धेय्याशी केला की धेय्य गाठणे सहज शक्य होते.
प्रत्येक युवकांमध्ये ती तळमळ ती कळकळ असतेच, फक्त नेमके जिथं प्रयत्न करायला हवे, ज्या वयात करायला पाहिजे तिथे आणि तेव्हा केले जात नाही.

*आपल्यातील जिद्द, प्रयत्न अजूनही मेलेले नाहीत फक्त त्यांना डायव्हर्ट करण्याची गरज आहे, योग्य दिशा देण्याची गरज आहे.*

ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा झाला, त्याला त्याच्या प्रेयसीशिवाय काहीच सुचत नव्हतं, रात्रभर झोप सुद्धा लागत नव्हती, अन्न पोटात घालायची इच्छा होत नव्हती.
अगदी त्याचप्रकारे जेव्हा तो धेय्यवेडा होतो तेव्हा त्याला सुद्धा धेय्य पूर्णकेल्याशिवाय चैन पडत नाही, अन्न गोड लागत नाही. 
ती ध्येय त्याला स्वस्थ बसूच देत नाही, रात्री झोपु देत नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ध्येय्यचं दिसायला लागते आणि जेव्हा असे होते तेव्हा आपण धेय्याच्या मार्गाने यशस्वी मार्गक्रमण करीत आहोत असे समजावे. मरण सुद्धा त्यांच्यात अडसर ठरत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
यात जमेची बाजू म्हणजे धेय्य हे प्रेयसीप्रमाणे नसल्याने त्यांना  आपण आवडलो नाही किंवा आपण श्रीमंत नाही, आपली जात श्रेष्ठ नाही म्हणून कधीही नकार देणार नाही. जो तिथपर्यंत पोहचला धेय्य त्याचे झाले. धेय्य हे आहेत त्या जागी निश्चल पडलेले असतात. गरज असते फक्त आपल्याला त्या दिशेने जाण्याची, तिथपर्यंत पोहचण्याची. प्रत्येकाने खबरदारी एवढीच घ्यावी की आपण कुठे कमी पडू नये, मागे राहू नये.
एकदा का आपण धेंय्यांच्या प्रेमात पडलो की यशस्वी झालोच म्हणून समजा.

एक गोष्ट लक्षात असू द्या,
_जेव्हा अलार्म ऐवजी जबाबदारी, जाणीव आपल्याला झोपेतून उठवते तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो._
_यशाच्या मार्गात परिस्थिती कधीच अडसर ठरत नाही, अडसर ठरते तर फक्त ती जिद्द_

_ज्यांच्या जिद्दीला लकवा मारलेला असतो यश त्यांना नेहमी चकवा देत असते.._

*तर चला आजपासूनच आपल्या धेय्यांच्या प्रेमात पडा, त्याच्याशी एकरूप व्हायला शिका आणि यशाला आलिंगण देण्यासाठी तयार व्हा..*

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

खास माह्या बायकोसाठी...*

*खास माह्या बायकोसाठी...*

ना चाकलेट आनलं कवा तिले,
ना देल्ला कधी टेडी,
तरी प्रेम करते थे,
हाय मीरे सारखी वेडी..

रुसनं फुगनं सारं तीचं,
तेवळ्यापुरतंच असते..
थे नसली घरात का,
घराले घरपन नसते..

प्रेमाचे चार शब्द तिले,
गुलाबापरी असतात,
यापेक्षा अपेक्षा तिच्या,
फार मोठ्या नसतात..

हाय फाय नसते डिमांड तिची,
राह्यते साधी सुधी,
येवळच प्रेम करीन थे,
झाली जरी बुढी..

कायजी असते बंबाट माही,
फोन रोज करते,
उलीसक बिमार पडलो का,
तिले कोसोदुरूनचं कयते..

आवाजावरून अंदाज तिले,
माह्या तब्येतीचा येते,
माय नंतर कायजी भाऊ,
तेच माही घेते..

घड्याळीचा काटा चुकीन,
पन थे नाई चुकत,
नोकरी करून करते थे,
समद्यायचं न थकत..

नशीब म्हनू का पुन म्हनू ?
माह्या पुरव जन्मीचं?
बायको म्हणून नातं तीचंच,
लाभो सात जन्मीचं.


सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

समाजाच्या काय तू कामी पडला.....

*समाजाच्या काय तू कामी पडला..?* 

'मान्य आहे शून्यातूनी ,
 तू  लयी वरती चढला..
'पण सांग तू गड्या
समाजाच्या काय कामी पडला...?


'धनामधली कोणासाठी
मोडली नाही काडी...
दरवर्षाला स्वतःसाठी ,
घेत गेला 'गाडी...
दिला नाही ' कांदा जरी
घरी तुझ्या सडला......
'सांग तू जरा   समाजाच्या काय तू कामी पडला....?

तुझा नित्त्य चढत आहे
मजल्यावरती 'मजला....
लहानपणीचा तुझाच 'यार '
ऊघड्यावरती निजला...!
तुझ्यामधला मित्र गड्या
सांग कुठे दडला...?
'सांग  तू जरा  समाजाच्या काय  कामी पडला...?

'गरिबीनं गांजलेली
 माणसं आला बघत...
तरीही तू आपल्याच आहे ,
 मस्तीमध्ये 'जगत....
तुझ्यावाचून नाही जरी
संसार त्यांचा 'अडला...
पण सांग तू जरा  समाजाच्या काय
कामी पडला...?"


'जन्मल्या त्या समाजाचा
 जरा ऋणी राह्य तू....
'मागे राह्यल्या समाजाला ,
मागे वळून पाह्य तू...
कोणी नाही पुसत ऊद्या ,
तू  कितीही 'मोठा घडला...
सांग तू  जरा  समाजाच्या काय कामी पडला..?


🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

काहीतरी तिला सांगायचं होतं*


_ज्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण बोलू शकले नाहीत अशा सर्वांसाठी.._

*काहीतरी तिला सांगायचं होतं*


मनातलं आज बोलायचं होतं,
काहीतरी तिला सांगायचं होतं,

काळ्याकुट्ट मेघांनी,
जसं आभाळ भरून यावं,
तसं सर्व माझ्या ओठांपर्यंत आलेलं..

जणू वाटायचं,
आता नुसतं मेघ ,
धो-धो कोसळणार आहे..
मनातलं सार काही गुपित,
तिला आज सांगणार आहे..

पण व्हायचं ते भलतंच,

समोर येताच क्षणी ती,
मेघांची गर्दी अचानक नाहीशी व्हावी,
आणि भरलेलं आभाळ निरभ्र व्हावं,
अगदी तसंच बोलायचं ते,
विसरून जायचो..

देव जाणे कशी तेव्हा,
बोबडी माझी वळायची..
पाठीमागे लपवलेली,
फुले अकस्मात गळायची..

महारथी कर्णाला जसे रणांगणार,
अंतसमयी, अटीतटीच्या वेळी, विद्येची विस्मृती झाली होती..
अगदी तशीच विस्मृती, तिच्यासमोर असतांना माझी व्हायची..

रटलेलं, लिहलेलं, ठरवलेलं,
दडवलेलं सारं जागीच थिजून जायचं.

हे असंच चालू होतं..

अशातच माझे,
दिवसच नव्हे तर वर्ष निघून गेली,
मनातली गोष्ट मनात दबून गेली..

ना ती कधी बोलली,
ना मी कधी बोललो,
पण विरहात मात्र दोघेही,
कायमस्वरूपी जळलो..

वाटतंय कुठेतरी मनाला,
जर कदाचित तेव्हा तिला,
सारं काही सांगून दिलं असतं,
मनावरचं ओझं तरी,
आयुष्यभरासाठी हलकं झालं असतं..



*Happy Propose Day*

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

रोझ_डे निमित्त केलेली रचना आपल्यासाठी

#रोझ_डे निमित्त केलेली रचना आपल्यासाठी

पहाटेला उठुनी लवकर,
तयारीशी लागलो झटपट,
आई म्हणाली घाई कसली?
पाहुनी माझी ती लगबग..

अग आज रोझ डे,
लवकर कॉलेजात जायचंय,
आपल्या प्रिय व्यक्तीला,
एक एक रोझ द्यायचंय..

आई म्हणाली सर्वच,
सारखेच असतात डे,
तिला म्हणालो तसं नाही,
थोडा वेगळा असतो हा "डे".

फुले तोडण्या  गुलाबाची,
पटकन मी बागेत गेलो,
फुले नसल्याचे पाहूनी एकदम,
आईवरती फिरलो..

बागेतील फुले गुलाबाची,
सांग कुणी तोडली ?
आठवड्यांपासुनी ज्याची सतत,
निगराणी मी केली.

आता कोठून आणू फुले,
सांग तू वेळेवरती,
रागानेच भडकलो मी,
त्या प्रेमळ माऊलींवरती...

स्मित करुनी आई म्हणाली,
मीच ती फुले तोडली,
माझ्या प्रिय देवांस,
त्यापैकी वाहिली..

"रोझ डे" म्हणुनी काही,
तुजसाठीही ठेवली,
तोडल्यापैकी काहीच फक्त,
देवांस मी वाहिली..

तशीच ती फुले घेतली,
व्यवस्थित बॅगेत भरली,
गाडीला किक मारली
अन वाट कॉलेजची धरली..

अर्ध्या वाटेत जाता जाता,
एक विचार आला मनी,
आईपेक्षा आहे का?
खरचं जवळचा कुणी?

विनाकारण फुलांसाठी,
मी तिच्यावरती भडकलो,
रागारागातच तिला,
भलेबुरे ही बोललो..

माफी मागावया तिची,
मी गाडी तशीच मागे घेतली,
चरणाशी वंदूनी तिच्या,
माफी ही मागितली..

देऊनी "रोझ" तिला तो,
साजरा केला "रोझ डे"
आईपेक्षा प्रिय कोणी?
असते का सांगा तुम्ही गडे !


मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रतिबिंब तुझे


वाहती अश्रू डोळ्यांमधुनी,
प्रतिबिंब तुझे
तरी मिटेना,
काळजाचे तुकडे जाहले,
वेदना जीवाची तुज दिसेना..

कयास केले बहु भुलण्याचे,
चेहरा तुझा तरीही भुलेना,
चुकलो जरी वाट तुझी मी,
ओढ भेटीची तरी मिटेना..

विश्वात रमलो तुझ्या असा की,
अस्तित्व माझे कुठे दिसेना,
जळतो तुझ्याचसाठी निरंतर,
पण किंमत माझी तुला कळेना.

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

नवऱ्याचं पोट*


               *नवऱ्याचं पोट*

काय सांगू तुले माह्या,
बायकोची गोट,
उठता बसता काढते माह्य,
बाहेर निंगेल पोट..

पोटाशिवाय दुसरी राजा,
गोट नाई करत,
किती काही केलं तरी,
मांस नाई झरत..

सकाय संध्याकाय तिले,
एकच असते इचार,
चार चौघात करते माह्या,
पोटाचा प्रचार..

घरा बाहिर पळून म्हणे,
पोट करा कमी,
रातीच्या पोळ्या केल्या,
अर्ध्यापेक्षा कमी,

भात नाई तूप नाई,
सुक सुक देते,
माह्या देखत तुपाची,
धार वरणात घेते..

भाजीपाला खाऊ खाऊ,
वैताग आला मले,
भाईर खायासाठी,
मन माह्य झुरे..

झाकट पळल्या लागते घरात,
रामदेव बाबा,
असा बायकोन माह्यावर,
घेतला ताबा..

हालत ऐकून माह्यावाली,
दोस्त मले हाशे,
असे कशे म्हणे तुये,
उलट पळले पाशे..

वाघ होता म्हणे तू,
शेळी कसा झाला?
आभायातून म्हणे तू,
खाली कसा आला?

लगनाआंदी राजा माई,
बम मजा होती,
भीती बायको नावाची,
अजीबात नोती..

जस वाटलं तस तवा,
खावो राजा मस्त,
अख्खी एक कोंबडी,
म्याच करो फस्त..

दारू चा त लागे मले,
मयनाले खोका,
खाऊन पिऊन होतो म्या,
मस्तवाल बोका.

बायकोनं माही सारी,
मस्ती टाकली जिरून,
खानाऱ्यांच्या तोंडाकडं,
पाह्यतो म्या झुरून..

भाईर खायापेयाची,
मले नाई मुभा,
तोंड पाह्यत पंगतीत असतो,
म्याटासारखा उभा...

लै दिवसान आज,
बायको गेली गावा,
चल खाऊन पिऊन,
ऐश करू भावा..

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

संकल्प आहे तोच, पण उत्साह आहे नवा,

संकल्प आहे तोच, पण उत्साह आहे नवा,
अखंड तेवत राहो, महावितरणचा दिवा..

अंधार फाकवतो, उजेडाचा स्पर्श,
सुखी, समृद्धी अन भरभराटीचं,
जावो नवं वर्ष..

या नवं वर्षात देवाच्या दारी असलेली मागणी.

देवा तुझ्या दारी असा,
भूकंप होऊ दे,
जाती-मत्सर-अविवेकाची,
भिंत कोसळू दे..

नांदो सुखात प्राणी,
भारत देशाचा,
जावो लयाला भेद,
गरिबी-श्रीमंतीचा,
देवा तुझ्या दारी बंधुभाव,
रुजू दे..

निराक्षरांच्या ओंजळी दे,
ज्ञानाच्या ज्योती,
शीलवान करण्या दे तू,
संस्कार मोती..
देवा तुझ्या दारी अज्ञानाचा,
अंत होऊ दे..

स्त्रीलाही पुरुषासम,
मिळू दे सन्मान,
परस्त्री असावी,
मातेसमान..
देवा तुझ्या दारी वासनेचा,
लोप होऊ दे..


मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...