_*हिला* समजून घेतलं की खरा *म"हिला"* दिवस.._
बायका म्हणजे पुरुषांच्या हातातील दुर्दैवी खेळणं ( पण पुरुषच स्वतः खेळणं असल्याच्या आव दाखवतात), सोशल मीडियातून तिच्यावर जोक्स करणं, कंमेंट्स करणं आजकाल सर्व नॉर्मल...
कारण त्या अगदीच बालबुद्धी असतात असा आमचा काहीसा समज..
अरेच्चा चुकलो...
समज नव्हे तर दृढ विश्वासचं..
एकही दिवस असा नसेल की, सोशीलमीडियावर बायकोविषयी जोक्स आम्ही फॉरवर्ड करत नसणार... "हे बायकोवरचे जोक्स म्हणजे आपली बायको सोडून केलेले जोक्स असतात, असं पाठवणारे गृहीत धरतात..
हे तर असंच झालं की, एखाद्या भारतीयाने म्हणावं, भारतीय मूर्ख आहेत, आणि त्यात आपण नाही अशी समजूत करून घेणे..
त्यामुळे बायकोवर जोक्स करतांना, ते फॉरवर्ड करतांना अनामिक आनंद लग्न झालेल्यांना आणि न झालेल्यांना सुद्धा असतो.
लग्न न झालेले तर आपण आता आयुष्यात कधी लग्न करणारच नाही अशा अविर्भावात बायकोवरचे मॅसेज पाठवून टिंगल उडवत असतात.
बायको नावाची संज्ञाच आपण चिल्लर करून टाकली आहे. पण ती आई या संज्ञेएवढीच पवित्र आहे हे आपण सर्रास विसरून जात आहोत.
खरं तर बायकाही जास्त दिमाग लावतच नाहीत. कारण त्यांना आपला नवरा हुशार आहे यात समाधान असतं.. घरातील जबाबदारीच ओझं त्यांना दिमाग लावूच देत नाही.
बर हे आजपासूनच चालू आहे असे नाही.. तर अनंतकाळापासून स्त्रिया-बायकांना दुय्यम स्थान दिले गेले..
मनोरंजन आणि भोगवस्तू म्हणून त्यांचेकडे पाहिले गेले..
मुघलांच्या काळात तर भर रस्त्यावरून तिला घरच्यांच्या डोळ्यादेखत उचलून नेले जात होते.. पती मेला की तिने जीवंत सती जावे..
आणि पत्नी गेली तर नवऱ्याने दुसरी बायको करावी..
एका नवऱ्याला एकापेक्षा जास्त पत्नी करायला हरकत नव्हती पण तिने मात्र एकाच नवऱ्यासोबत जगावं आणि मरावं..
मागे झोम्बी कादंबरी वाचली. त्यातील नायिकेला तीने केवळ मुलीला जन्म दिला म्हणून किती यातना सहन कराव्या लागल्या.
वाचणाऱ्याच्या डोळ्यातून त्या पाठीवर बसणाऱ्या चाबकागणिक अश्रू वाहत असतील तर तिने किती खस्ता खालल्या असतील याची अपेक्षाच न केलेली बरी..
केवळ मुलगी आहे म्हणून तिला दूध भात देखील खायला मिळत नव्हता कारण ते सर्व मुलांसाठीच..
आधीपासून चूल आणि मूल ही दरवार्षिक योजना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये समाजाने इन्स्टॉल केली त्यामुळे त्या एका सीमित कक्षेपलीकडे विचारचं करत नव्हत्या आणि करायला गेल्या तरी पुरुष प्रधान संस्कृती आहेच रोखायला.
ते तेवढं तरी बरं झालं, देशाच्या घटनेने स्त्री पुरुष समानता अधिकार बहाल केला, म्हणून एक महिला देशाची राष्ट्रपतीच नव्हे तर चंद्रावर देखील पाऊल ठेवून आली.
तिला जर संधी दिली तर तिने सिद्ध करून दाखविले आहे की ती पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच सरस आहे..
पण आम्ही पुरुष..
मुलींनी घरी किती वाजता यावं, त्यांनी काय घालावं, काय बोलावं, कसं वागावं यावर निर्बंध घालून त्यांना त्यांना आवर घालू..
आजही ज्या घरात बहीण भाऊ आहे तिथे जेवण झाल्यावर भावाचे ताट बहिणीनेच उचलावे व धुवावे अशी प्रथा आहे..
निसर्गाचा नियम आहे की एखाद्या रोपट्याला हवा, पाणी आणि ऊन योग्य प्रमाणात मिळाले नाही तर त्या रोपट्याची हवी त्या प्रमाणात वाढ होत नाही.
पती जेंव्हा हिम्मत हारतो तेंव्हा हिम्मत देणारी पत्नीच असते. स्वतःची जन्मजात ओळख पतीबरोबर त्याची जीवनसंगिणी होऊन मिटवून टाकते. आजारपणात पुरुष महिलांची जी सेवा करत नसेल ती सेवा आईनंतर केवळ एक पत्नीचं करू शकते. मुलांना संस्कार देण्याचे काम सुद्धा तीच करते.
आणि आम्ही म्हणतो,
ती कुठे काय करते?
खरं तर आज,
महिला दिवस,
*वूमन डे*
ज्यांचं *मन* हे कधीच स्वतःचा विचार करत नाही अशा त्या *वुमन*
त्यांचं *मन* जिंकता आलं तर खरा *वुमन डे*
आई असते तेव्हा लेकरांचा, बहीण असते तेंव्हा भावाचा,
पत्नी असते तेंव्हा पतीचा विचार करते..
ती आयुष्यभर नेहमी दुसऱ्याचाचं विचार करते. म्हणून ती श्रेष्ठ ठरते पुरुषांपेक्षाही...
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तर ग्रामगीतेमध्ये महिलांविषयी एक स्वतंत्र अध्यायच लिहला,
ते म्हणतात,
विद्यागुरुहुनि थोर । आदर्श मातेचे उपकार।।
गर्भापासुनी तिचे संस्कार । बालकावरि ।।
'जिच्या हाती पाळण्याची दोरी ।
तीच जगाते उद्धरी '।
ऐसी वर्णिली मातेची थोरी ।
शेकडो गुरुहूनिहि ।।
मातेच्या स्वभावे पुत्राची घडण ।
त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन ।
स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचे मोठेपण ।
ऐसे आहे ।।
म्हणती जरि बाप तैसा लेक ।
परि माउलीचे महत्व अधिक ।
मातृशक्तीनेच वाढती सकळिक ।
मुले चारित्र्याने ।।
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरगिणी नाही ।
स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ।।
मुलीने सदा लपोनि राहावे । मुलाने गावी रागरंग पाहावे ।
ऐसे हे दृष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हा ।।
जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना ।
आपुल्या सुखदुखाच्या भावना । प्रकटवाव्या सभा-संमेलनी ।।
स्त्री-पुरुष ही दोन चाके । जरी परस्पर सहायके ।
तरीच संसार - रथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ।।
आज मी तुमच्यासोबत केवळ एका महिलेमुळे आहे. कधी ती आई, कधी बहीण, मैत्रीण तर कधी पत्नी म्हणून कुठल्या ना कुठल्या नात्यातून आपल्यासोबत असते.
म्हणून आई या प्रमाणे बहीण, मैत्रीण, पत्नी यांचा देखील सन्मान व्हावा हीच अपेक्षा.
समाजी जो पुरुषांशी आदर,
तैसाचि महिलांशी असावा व्यवहार।
किंबहुना अधिक त्यांचा विचार,
व्हावा समाजी ।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा