सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

ती सध्या काय करते?



ती सध्या काय करते?
यापेक्षा *तो सध्या काय करतो?*
हा प्रश्न मला अधिक सतावतो,
आणि त्याच्या विचाराने,
मग मी दुखावतो..

कारण ही तसंच आहे..

हिरवकंच बहरलेलं झाड,
एकदम सुकावं,
तसं त्याच आयुष्य तिच्या मागे लागून,
बर्बाद झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं..

तो हुशार होता,
नुसताच हुशार नाही तर
आमच्या कॉलेजातील,
प्रेमाचा तुषार होता..
दिलदार होता..
दमदार होता,
सोबतच मनाने हळवाही होता..

तो तिच्या प्रेमात पडला,
आणि असा काही पडला,
की नंतर बाहेरच आला नाही..
पार बुडाला होता तो,
तिच्या आकंठ प्रेमात..

अख्ख कॉलेज त्याला,
प्रेमाची मिसाल मानत होतं..
तरुण तरुणी प्रेमासाठी,
त्याची आणाभाका घेत होतं..

प्रेम करावं तर त्या पठ्ठ्यासारखं..
पतंगा होऊन,
आयुष्य खाक करणारं,
साला सब कुछ
तिच्यावर कुर्बान करणारं..

मला ही असंच वाटतं होतं
तेव्हा...

पण बरं झालं मला जमलं नाही..

ज्याच्या आणाभाका पोर पोरी तेव्हा घ्यायचे,
त्याच्यासारख आपण ही करावं,
माझ्याही मनात यायचे.

त्याच अस्तित्वच आज हरवलंय..

तो आता अंधारात कुठंतरी जीवन कुंठत असेल..
आणि आज तर नक्कीच कुणाच्या स्मरणातही नसेल..

पार फिटला तो तिच्यापायी,
वेडावला तो तिच्यापायी..
तिच्याच मागे असायचा,
तिच्याच सेवेत असायचा,
असं वाटायचं कॉलेजला तो,
फक्त तिच्यासाठीच असायचा..

मी ऐकलं,
ती आता सेटल झाली,
पण तो..
तो मेंटल झाला..
त्याचा अतापता नाही,
"लापता" आहे तो तिने नकार दिल्यापासून..

वेळ-पैसा त्यानं पाण्यासारखा
गमावला होता त्यानं,
तिच्या प्रेमात..
नकार मिळाल्यावर देखील,
तसूभर देखील फरक नव्हता,
त्याच्या नित्यनेमात..

हतबलता नैराश्याशिवाय,
काहीच नव्हतं त्याच्या हातात,
जे होते
फॅमिली- दोस्त या,
साऱ्यांपासून तो दुरावला होता,
अन विजनवासात,
कुठेतरी स्थिरावला होता..

मन सुन्न होते,
त्याच्या आठवणींनी,
तो सध्या काय करत असेल?
या विचारांनी..


शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

Bhastachar


_बस !!_
_पुरे झाले आता,_
_भ्रष्टाचार करणाऱ्याच्या,_
_कंबरेत घाला लाथा,_

_भ्रष्ट अधिकारी अन नेत्यांचे,_
 _देशात वाढले प्रस्थ,_
_नागरिक देशाचे,_
_ह्यांचेमुळेच त्रस्त,_

_चित्रपट आले कितीही,_
_दंगल आणि गब्बर,_
_सुधारणार नाहीत हे,_
_फटके दिल्याशिवाय जब्बर,_

_भ्रष्टाचाराच या देशाला_
_लागलं आहे ग्रहण,_
_अजुन किती दिवस त्रास_
 _जनतेने करावा सहन,_

_ह्यांच्यामुळे देशाचा,_
_झुकला आहे माथा,_
_भ्रष्टाचार करणाऱ्याच्या_
_कंबरेत घाला लाथा,_

_भेसळ आणि साठेबाजीचे_
_यांचे गोरखधंदे,_
_उपासमारीने मरतायत,_
_देशातील गोरगरीब बंदे,_

_गरिबी-श्रीमंतीची_
_वाढत आहे दरार,_
_देशाला लुटायचा जणु_
_यांचा पाच वर्षाचा करार,_

_गुणीजनांना देशात माझ्या,_
 _कवडिमोल किंमत,_
_भ्रष्ट नेते अन अधिकाऱ्यांची,_
 _दिवसेंदिवस वाढत आहे हिंमत,_

_शेतकरी इकडे कष्टाने,_
_होत आहे हलाल,_
_बाजारपेठेत श्रीमंत,_
_होत आहेत दलाल_

_देशाच्या विकासाला_
_यांच्यामुळेच बाधा,_
_अहो संपणार  कधी भ्रष्टाचार?_
_हा प्रश्न माझा साधा,_

_भ्रष्ट नेते अन अधिकारी_
_जोवर आहेत या देशात,_
_आम जनतेलाच वाटतं,_
_यावे लागेल त्वेशात,_

_भ्रष्टाचाराच मुळ हे,_
_आमच्यातच आहे लपलं,_
_कारण मतदानाच्या दिवशी_
_मत आम्हीच होतं विकलं_

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

Aaiiii



आज आईचा वाढदिवस त्यानिमित्त खास तिच्यासाठी लिहलेली ही कविता..

काय मागु देवा आता,
उरलेची नाही,
जे जे दिलेस तू,
मला पुरलेची नाही.

असे कोणते मागणे देवा,
तुजकडे मागु,
पुन्हा गरज भासणार नाही,
ज्याने वरदान होईल लागू..

देव हसला अन बोलला,
तुझी एकच मागणी असावी,
मागेल माझी आई जे,
तिची मागणी पूर्ण करावी.

पुन्हा तुला वेगळं काही,
मागावे नाही लागणार,
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट,
तुझ्या मनाप्रमाणेच घड़णार..

मी विचारलं देवाला,
खरचं अस होईल का?
देव म्हणाला तुझी,
माझ्यावर श्रद्धा नाही का?

आई नेहमीचं मुलांचं,
सुख चिंतित असते,
म्हणूनच तर ती सर्वकाळ,
श्रेष्ठ माझ्यापेक्षा ठरते....
दर दोन तासांनी जेवावं की फक्त दोनदाच जेवावं...यावर केव्हढी ही चर्चा...
पण  दर दोन तासांनी तरी थोडं हसावं...
दर पंच्चावन्न मिनिटांनी कोणाला तरी हसवावं....
असं कोणीच सांगत नाही.

मुळात तुम्ही किती हसता  ....
हसवता...
किती प्रसन्न रहाता,
किती आनंदी रहाता...
हे महत्त्वाचे.
अन्न कसं पचवता
यापेक्षा दुःख कसं पचवता
हे जास्त समजूतदारपणाचे काम....
खाण्यापेक्षा
हसण्यातील प्रोटिन्स महत्त्वाचे.
ते पचवण्यासाठी वेगळा योगा नको...
हसता हसताच ते पचतात.

Ek vichar



_एक विचार सहज आला होता, सहज लिहला..._


एका क्षणी वाटलं,
बायको नावाची जबाबदारी नकोयं,
पण दुसऱ्या क्षणी वाटलं,
बायको नावाचा आधार हवायं..

जबाबदारी म्हणून ती नको असते,
पण आधार म्हणून मात्र ती हवी असते..

एका क्षणाकरिता ती नको असते,
पण असंख्य क्षणांकरिता ती हवी असते..

ती आहे म्हणूनच तर,
एवढा निष्काळजी वागू शकतो मी,
पण या निष्काळजीपणात,
तिची काळजी मात्र,
साफ विसरतोय मी..

खरं तर ती काळजी नसतेच,
ती असते प्रेम, माया, वात्सल्य,
प्रगती, यश, आधार यांनी तुडुंब भरलेलं जलाशय..
जो कधीच आटत नाही,
उलट आपण दुष्काळात असलं की,
तो ओसंडून वाहू लागतो..

बायको म्हणजे,
अवकाशात असंख्य तारका असल्या तरी,
शीतल मायेचा प्रकाश देणारा चंद्र,
बागेत नानाविध फुलांमध्ये,

स्वतंत्र अस्तित्व दरवळवणारा निशीगंध


*तेव्हा_आणि_आज*

एकेकाळी शेती, हिंमत होती,
माणसांची, किंमत होती..

पूर्वजांची, आन होती,
कुटुंबाची, शान होती.

समृद्धीची, सर होती,
आनंदात, भर होती..

शेती तेव्हा, रुबाब होती,
प्रत्येकाचा, ख्वाब होती..

पण,
शेती आता, धसकट आहे,
घरातील, कटकट आहे..

डोळ्यातलं, खुपणं आहे,
मनातलं, दुखणं आहे..

पिकलेलं, पान आहे,
उजाळलेलं, रान आहे..

शेती कर्जाचा, डोंगर आहे,
यातनांच गर्द, जंगल आहे.....

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपला बहुमूल्य ग्रामगीता ग्रंथ शेतकऱ्याला समर्पित करतांना सुरुवातीलाच म्हणतात,

*तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो,*
*सर्वांचे लक्ष तुजकड़े वळो*

त्यांना सुद्धा जाण होती की *शेतकरी जगला तर देश जगेल.* म्हणूनच की काय शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीविषयी ६० वर्षापूर्वीच लिहून ठेवतात. केवढा मोठा दूरदृष्टिकोण. शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय, प्रतिष्ठा मिळायला हवी. पण आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून देखील त्याची उपेक्षाच होत आहे.

_ज्यांना घरात सुद्धा पायात घालायला चपला लागतात, त्यांना रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात मातीचा चिखल अनवानी पायाने तुडवून पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी जाणवनार?_

_घरात साधी झुरळ, उंदिर निघाला तर हातभार उडी मारणाऱ्याला शेतात दबा धरून बसलेल्या सापासमोरून,नांगी टवकारून बसलेल्या विंचवाच्या वाटेतून चालत जाणाऱ्या शेतकऱ्याचे हाल काय समजणार?_

_दरमहा पगार घेणाऱ्या, सुटीच्या दिवसाचे देखील वेतन मिळणाऱ्याला शेतमजुराची मजूरी देण्यात असमर्थ असलेल्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार?_

_उत्पादित मालाला किती नफा मिळेल याची पूर्व गणितीय आकडेवारी जोडणाऱ्या व्यापाऱ्याला, उत्पादकाला, उद्योजकाला उन्हातान्हात घाम गाळुन, रक्ताच पाणी करून पिकवलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चाएवढा जेंव्हा भाव मिळवता येत नाही त्या शेतकऱ्याची अगतिकता कशी कळणार?_

_हातचा क्रिकेट सामना गमावला म्हणून अतीव दुःख करत बसणाऱ्या तरुण पिढीला कापणीला आलेलं शेतकऱ्याचं पीक अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे हातचं जातंय त्याचं दुःख कस कळणार?_

_नुसते सातबाऱ्यावर नाव चढवून शेतकरी म्हणून मिरवणाऱ्याला  शेतकऱ्याच्या वास्तविक जीवनातील कष्ट कसे कळणार?_

_उन्हाळ्यात कुलर किंवा ए सी मधे बसणाऱ्याला भाजणाऱ्या उन्हात शेतात मजूरी करणाऱ्या शेतकाऱ्याचे दुःख कसे कळणार?_

_टीआरपीच्या मागे लागून क्षुल्लक बातम्या दाखवणाऱ्या  मीडियाला झाडाला लटकून घेतलेले, फवाऱ्याचं औषध प्राशन घेतलेले शेतकरी कसे दिसणार?_

_काहीजण म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांची जरा जास्तच काळजी करता. अर्थव्यवस्थेत सर्व घटक सारखेच असतात. मी म्हणतो होय मी करतोय जास्त काळजी. मला जास्त अर्थव्यवस्था समजत नाही पण जेवढी समजते त्यानुसार अर्थव्यवस्थेत जरी सर्व घटक महत्वाचे असले तरी शेती आणि शेतकऱ्याची तुलना इतर व्यापार उद्दिमांशी केलीच जाऊ शकत नाही. कारण या सर्वांमधे त्याला अत्युच्च स्थान आहे. ज्याप्रमाणे समाजात सर्व नात्यांचे महत्व असले तरी _*आईला विशिष्ठ स्थान आहे अगदी तेच स्थान अर्थव्यवस्थेत इतर व्यापार उद्दीमांत शेती आणि शेतकऱ्याचे आहे.*_

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

Surya



सूर्यही आता मज,
सावली देत आहे,
त्याने पाहिले मी
चटके सोसलेले..

वेदनाही आता मज,
बधिर होत आहे,
त्यांनी पाहिले मी,
घाव सोसलेले..

पाऊसही आता मज,
भिजवत नाही,
त्याने पाहिले मला,
अश्रुंत नाहलेले..

चुकूनही आता मज,
कुणी लुटत नाही,
त्यांनी पाहिले माझे,
लचके तोडलेले..

मरणही आता मज,
कवटाळत नाही,
त्याने पाहिले मी,
मरण जगलेले......

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

I'm

_*(प्रत्येकवेळी मोठं होण्यासाठी मोठं काम करावंच लागेल असं नाही. इतरांनी काही न केल्याचा किंवा कमी काम केल्याचा देखील लाभ आपल्याला मिळत असतो.)*_

_मला १० वी पर्यंत ६५-७० च्या दरम्यानच टक्केवारी मिळायची.
 पण तरीही मी वर्गात प्रथम असायचो. कारण इतरांना माझ्यापेक्षा कमी टक्केवारी असायची. पण म्हणून मी हुशार विद्यार्थी होतो असा अर्थ निघत नाही._
_इतर शाळेतील मुलांचे किंवा वृत्तपत्रातून जेव्हा वाचायला मिळते तेव्हा मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळतात._
_परंतु येथे इतरांनी कमी गुण मिळवले म्हणून माझं महत्व वाढत गेलं. शाळेत भाषण द्यायचं किंवा काही उपक्रम असल्यास माझे मित्रच मी शाळेत हजर असलो नसलो तरी माझं नाव पुढे करून आपल्यावरची वेळ काढून घ्यायचे.._
*इतर संधी टाळत गेले म्हणून मला संधी मिळत गेली आणि अशाप्रकारे वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून उदयाला आलो.*

_काही सोडून देतात म्हणून आपल्याला ते भेटण्याची संभाव्यता जास्त होत जाते. आपण फक्त तयार राहावे, सातत्य ठेवत रहावे. आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करत रहावे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. उत्तमोत्तम कामगिरी करण्यापेक्षाही स्पर्धकाने काही चूक केल्याचा देखील बरेचदा फायदा मिळतो. याचा अर्थ असा नाही की, आपण आपलं बेस्ट देऊच नये._
_क्रिकेटच्या एका सामन्यात जिंकण्यासाठी एका चेंडूत पाच धावा पाहिजे होत्या. सामना हातचा गमावला म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकण्याची आशाच सोडली. कारण जो फलंदाज होता त्याने आजवर कधीच साधा चौकार देखील मारलेला नव्हता पण ऐनवेळी गोलंदाजाने वाईड चेंडू फेकला आणि यष्टीरक्षकाच्या हातून देखील चेंडू सुटला आणि चार धावा फक्त उभं रहाण्याच्या मिळाल्या आणि पुन्हा चेंडू टाकण्यात आला आणि एक धाव काढण्यात यश मिळाले. समोरच्या स्पर्धकांच्या चुकीमुळे फलदांजी करणारा संघ जिंकला._

_स्पर्धक कधी ना कधी चुक करणारच आणि त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला बरेचदा मिळून जातो._

_ससा आणि कासवाच्या शर्यतीत देखील असच झालं. कासव आणि सशाची धावण्याच्या बाबतीत स्पर्धाच होऊ शकत नाही. परंतु तरीही या शर्यतीत कासव जिंकला कारण सशाने (प्रतिस्पर्धी) याने चूक केली. तो झोपला आणि कासव याने संयम आणि सातत्य ठेवले._

_असाच एक व्हाट्सअपवरचा मॅसेज माझ्या वाचनात आलेला. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी व्यक्ती निल आर्मस्ट्राँग होती. परंतु त्या व्यक्तीची नेमणूक को-पायलट म्हणून झालेली होती आणि ज्या व्यक्तीची चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी नेमणूक झाली होती तिने ऐनवेळी भीती बाळगल्याने ती मागे राहिली आणि चंद्रावर पहिलं पाऊल पडलं ते निल आर्मस्ट्राँग यांच._

*म्हणून प्रत्येकवेळी मोठं होण्यासाठी मोठं काम करावंच लागेल असं नाही. इतरांनी काही न केल्याचा किंवा कमी काम केल्याचा देखील लाभ आपल्याला मिळत असतो.* _फक्त आपण आपल्या धेय्याप्रती संयम आणि सातत्य टिकवून ठेवलं पाहिजे._
_वरील उदाहरणात फलंदाजांचं खेळपट्टीवर टिकून राहणं, कासवाच आपलं सातत्य टिकवून ठेवणं आणि निल आर्मस्ट्रॉग यांचं निर्भीड होऊन पुढे जाणं महत्वाचं होतं._

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

Kavita



*व्यंग हास्यरस कविता*

_आजच्या नाट्यमय घडामोडीवर सुचलेली कविता, कृपया कवितेकडे केवळ व्यंग म्हणून  बघावे._

कानोकान नवती,
कोनालेबी खबर..
रातोरात देल्ला भाऊ
दनका लै जबर..

पोरगी झालती पसंद,
पन बैठका लै झाल्या,
अशातच दुसऱ्यानं,
नंबर मारून देल्ला..

समद शिजून तैयार,
पन गंज गेला उलटून..
बैठका घेन्या घेन्यात,
डाव गेला पलटून,

रातोरात उसातली,
साखर झाली गायब,
धनुष्याची तार,
खिचत राह्यले सायब..

बारशाच्या तयारीत,
बिझी होता पंजा,
म्होरली तारीख देऊ देऊ,
थकला होता संज्या..

तोंडात बोटं टाकून,
समदे रायले पाह्यत
गाभण म्हैस राह्यली,
नुसत्या कळा काहळत..

राजकारनात काय होईन,
ह्याचा नाही नेम,
म्हनून म्हनतो कोनावर,
देऊ नका ब्लेम..

जे होते ते,
मुकाट्यानं पा,
थंडीचा मजा,
झटक्याईन घ्या.....


गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९


आम्हा सर्वांना,
देऊळीचा देव आवडतो,
कारण तो नेहमी,
गप्प असतो.
आपलं ऐकून घेतो..
आपल्याला,
उपदेश करीत नाही,
म्हणून आम्हाला,
देऊळीचा देव आवडतो..

किती ही पाप केलं तरी,
त्याच्या दर्शनाने,
त्याच्या पेटीत दान टाकल्याने,
त्याच्या नावाने उपवास केल्याने,
पाप धुतल्या जातात,
म्हणून आम्हाला,
देऊळीचा देव आवडतो..

तो सदविवेकी आणि पापी,
दोघांनाही सारखाच असतो,
त्याच्याकडे मतभेद नसतो,
जरी तुम्ही चांगले असो,

अथवा वाईट..
म्हणून आम्हाला,
देऊळीचा देव आवडतो..

तो कुणाला काहीच,
बोलत नाही,
किंवा टोकतही नाही,
त्याचे डोळे उघडे असतात,
पण तो नेहमी,
दुर्गुणांकडे डोळेझाक करतो,
म्हणून आम्हाला,
देऊळीचा देव आवडतो.....

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

दर दोन तासांनी जेवावं की फक्त दोनदाच जेवावं...यावर केव्हढी ही चर्चा...
पण  दर दोन तासांनी तरी थोडं हसावं...
दर पंच्चावन्न मिनिटांनी कोणाला तरी हसवावं....
असं कोणीच सांगत नाही.

मुळात तुम्ही किती हसता  ....
हसवता...
किती प्रसन्न रहाता,
किती आनंदी रहाता...
हे महत्त्वाचे.
अन्न कसं पचवता
यापेक्षा दुःख कसं पचवता
हे जास्त समजूतदारपणाचे काम....
खाण्यापेक्षा
हसण्यातील प्रोटिन्स महत्त्वाचे.
ते पचवण्यासाठी वेगळा योगा नको...
हसता हसताच ते पचतात.

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...