*नवऱ्याचं पोट*
काय सांगू तुले माह्या,
बायकोची गोट,
उठता बसता काढते माह्य,
बाहेर निंगेल पोट..
पोटाशिवाय दुसरी राजा,
गोट नाई करत,
किती काही केलं तरी,
मांस नाई झरत..
सकाय संध्याकाय तिले,
एकच असते इचार,
चार चौघात करते माह्या,
पोटाचा प्रचार..
घरा बाहिर पळून म्हणे,
पोट करा कमी,
रातीच्या पोळ्या केल्या,
अर्ध्यापेक्षा कमी,
भात नाई तूप नाई,
सुक सुक देते,
माह्या देखत तुपाची,
धार वरणात घेते..
भाजीपाला खाऊ खाऊ,
वैताग आला मले,
भाईर खायासाठी,
मन माह्य झुरे..
झाकट पळल्या लागते घरात,
रामदेव बाबा,
असा बायकोन माह्यावर,
घेतला ताबा..
हालत ऐकून माह्यावाली,
दोस्त मले हाशे,
असे कशे म्हणे तुये,
उलट पळले पाशे..
वाघ होता म्हणे तू,
शेळी कसा झाला?
आभायातून म्हणे तू,
खाली कसा आला?
लगनाआंदी राजा माई,
बम मजा होती,
भीती बायको नावाची,
अजीबात नोती..
जस वाटलं तस तवा,
खावो राजा मस्त,
अख्खी एक कोंबडी,
म्याच करो फस्त..
दारू चा त लागे मले,
मयनाले खोका,
खाऊन पिऊन होतो म्या,
मस्तवाल बोका.
बायकोनं माही सारी,
मस्ती टाकली जिरून,
खानाऱ्यांच्या तोंडाकडं,
पाह्यतो म्या झुरून..
भाईर खायापेयाची,
मले नाई मुभा,
तोंड पाह्यत पंगतीत असतो,
म्याटासारखा उभा...
लै दिवसान आज,
बायको गेली गावा,
चल खाऊन पिऊन,
ऐश करू भावा..

