वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपला बहुमूल्य ग्रामगीता ग्रंथ शेतकऱ्याला समर्पित करतांना सुरुवातीलाच म्हणतात,
*तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो,*
*सर्वांचे लक्ष तुजकड़े वळो*
त्यांना सुद्धा जाण होती की *शेतकरी जगला तर देश जगेल.* म्हणूनच की काय शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीविषयी ६० वर्षापूर्वीच लिहून ठेवतात. केवढा मोठा दूरदृष्टिकोण. शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय, प्रतिष्ठा मिळायला हवी. पण आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून देखील त्याची उपेक्षाच होत आहे.
_ज्यांना घरात सुद्धा पायात घालायला चपला लागतात, त्यांना रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात मातीचा चिखल अनवानी पायाने तुडवून पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी जाणवनार?_
_घरात साधी झुरळ, उंदिर निघाला तर हातभार उडी मारणाऱ्याला शेतात दबा धरून बसलेल्या सापासमोरून,नांगी टवकारून बसलेल्या विंचवाच्या वाटेतून चालत जाणाऱ्या शेतकऱ्याचे हाल काय समजणार?_
_दरमहा पगार घेणाऱ्या, सुटीच्या दिवसाचे देखील वेतन मिळणाऱ्याला शेतमजुराची मजूरी देण्यात असमर्थ असलेल्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार?_
_उत्पादित मालाला किती नफा मिळेल याची पूर्व गणितीय आकडेवारी जोडणाऱ्या व्यापाऱ्याला, उत्पादकाला, उद्योजकाला उन्हातान्हात घाम गाळुन, रक्ताच पाणी करून पिकवलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चाएवढा जेंव्हा भाव मिळवता येत नाही त्या शेतकऱ्याची अगतिकता कशी कळणार?_
_हातचा क्रिकेट सामना गमावला म्हणून अतीव दुःख करत बसणाऱ्या तरुण पिढीला कापणीला आलेलं शेतकऱ्याचं पीक अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे हातचं जातंय त्याचं दुःख कस कळणार?_
_नुसते सातबाऱ्यावर नाव चढवून शेतकरी म्हणून मिरवणाऱ्याला शेतकऱ्याच्या वास्तविक जीवनातील कष्ट कसे कळणार?_
_उन्हाळ्यात कुलर किंवा ए सी मधे बसणाऱ्याला भाजणाऱ्या उन्हात शेतात मजूरी करणाऱ्या शेतकाऱ्याचे दुःख कसे कळणार?_
_टीआरपीच्या मागे लागून क्षुल्लक बातम्या दाखवणाऱ्या मीडियाला झाडाला लटकून घेतलेले, फवाऱ्याचं औषध प्राशन घेतलेले शेतकरी कसे दिसणार?_
_काहीजण म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांची जरा जास्तच काळजी करता. अर्थव्यवस्थेत सर्व घटक सारखेच असतात. मी म्हणतो होय मी करतोय जास्त काळजी. मला जास्त अर्थव्यवस्था समजत नाही पण जेवढी समजते त्यानुसार अर्थव्यवस्थेत जरी सर्व घटक महत्वाचे असले तरी शेती आणि शेतकऱ्याची तुलना इतर व्यापार उद्दिमांशी केलीच जाऊ शकत नाही. कारण या सर्वांमधे त्याला अत्युच्च स्थान आहे. ज्याप्रमाणे समाजात सर्व नात्यांचे महत्व असले तरी _*आईला विशिष्ठ स्थान आहे अगदी तेच स्थान अर्थव्यवस्थेत इतर व्यापार उद्दीमांत शेती आणि शेतकऱ्याचे आहे.*_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा